www.24taas.com, मुंबई
मान्सूनचे आगमन लांबलं आहे. मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी पाच दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालचा उपसागर आणि नैऋत्य अरबी समुद्रात मॉन्सूनची आगेकूच होण्यास दोन-तीन दिवस अनुकूल वातावरण आहे.
शुक्रवारी मान्सून केरळचा उंबरठा ओलांडण्याची अपेक्षा होती. मात्र, चार दिवसांपासून श्रीलंकेजवळच तो थबकला आहे. जूनच्या आधी किंवा नंतर पाच दिवस या कालावधीत मान्सून केरळात दाखल होण्याचा शक्यता नाही.
अरबी समुद्रातील चक्राकार वा-याच्या दबावामुळे मान्सूनला विलंब होत आहे. केरळमध्ये सर्वत्र पश्चिम वारे जोरात वाहू लागल्यानंतर सर्वदूर दमदार पाऊस सुरू होतो. सध्या केरळात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू लागला आहे, परंतु तो मान्सून नसल्याचे सांगण्यात आले आहे.