मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकासह गावच्या पोलीस पाटील अशा तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी येथे उघडकीला आली.
या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर याप्रकरणी पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध बलात्काराचा, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राजापूरमध्ये राहणारी तक्रारदार १५ वर्षीय अल्पवयी आई वडिलांसोबत राहते. त्याच गावातील पोलीस पाटीलांसह तिचा काका आणि अन्य एक साथीदाराने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने झालेला घटनाक्रम सांगितला. मात्र बदनामीच्या भीतीने तिच्या कुटुंबियांनी तक्रार न करताच मुंबईतील नातेवाईकांकडे धाव घेतली. त्यानंतर तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाकडून भोईवाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, गावचा पोलीस पाटील याच्यासह तिचा काका आणि अन्य एका साथीदाराविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, ही घटना राजापुरात घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा राजापुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.