मुंबई : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ही भेट झाली.
नवी मुंबई आणि ठाण्यातल्या दगडखाणी बंद झाल्यामुळे रस्त्यांचा कामांना खडी मिळत नसल्याचा मुद्दा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. काल रात्री आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिल्यात. मुंबईतल्या खाजगी शाळांची मनमानी फीवाढ हा मुद्दा युवा सेना हातात घेणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.