शिवसेनेला दणका, बबनराव घोलप यांना तीन वर्षांची सक्तमजुरी

शिवसेनेचे शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी माझगावच्या सेशन कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घोलप आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 1 लाखांचा दंड सुनावला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 21, 2014, 03:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे शिर्डीचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी माझगावच्या सेशन कोर्टाने दोषी ठरवले असून त्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. घोलप आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात तीन वर्षाची सक्तमजुरी आणि 1 लाखांचा दंड सुनावला आहे.
शिवसेना भाजप युती सरकारमधील माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्याविरोधात सेशन्स कोर्टात दाखल केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खटल्याचा निकाल आज देण्यात आला. घोलप यांना शिवसेनेतर्फे शिर्डीतून लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलिंद यवतकर यांनी घोलप यांच्याविरुद्ध १५ वर्षापूर्वी सेशन्स कोर्टात खासगी तक्रार केली होती. मात्र सुनावणी सतत रखडत होती. अखेर हा खटला न्या. दौलताबादकर यांच्यापुढे सुनावणीला येऊन त्यात तब्बल ३५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील पोलिस अधिकारी रमेश महाले यांचीही साक्ष झाली. महाले यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. मुख्य सरकारी वकील कल्पना चव्हाण यांनी या खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडली असून घोलप यांच्यासाठी अॅड. करडे हे काम पाहत आहेत.
तत्कालीन युती सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असताना घोलप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलींद यवतकर यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. घोलप यांनी १९९९ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व चर्मोद्योग महामंडळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. घोलप यांच्या मालमत्तेत मंत्री झाल्यावर मोठी वाढ झाली होती. या चार महामंडळातील आठ कोटी रुपयांची ठेव बुडित गेलेल्या अवामी को. ऑप. बँकेत गुंतविण्यात आली होती. घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा यवतकर यांचा आरोप आहे. शिवसेना आता लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्यावर कुठल्या तोंडानं बोलणार असा सवाल विचारला जातोय.

बबनराव घोलपांची कारकीर्द
> बबनराव घोलप सध्या शिवसेनेचे शिर्डीतील उमेदवार
> देवळाली कॅम्प मतदारसंघातून सलग ५ वेळा आमदार
> सलग पाच वेळा निवडून आलेले नाशिकमधले शिवसेनेचे एकमेव आमदार
> युती सरकारच्या काळात समाजकल्याण मंत्री
> मंत्रिपदाच्या काळात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप
> आरोपांप्रकरणी माझगाव कोर्टाची ३ वर्षांची शिक्षा
> आमदारकी आणि लोकसभेची उमेदवारी रद्द होणार

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.