मुंबई : महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली आहे., दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर लोणीकरांच्या प्रकरणाचीही चर्चा वाढली आहे.
लोणीकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीत तफावत दिसत आहे, म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा लोणीकर निवडून आले आहेत, लोणीकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी वेगवेगळी माहिती नमूद केलेली दिसते.
विशेष म्हणजे, लोणीकर यांनी आपल्या वेबसाईटवर ते बीए असल्याची माहिती दिली आहे. लोणीकर यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झालेले आहे. परतूर तालुक्यातील लोणी खुर्द या त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोणीकर यांनी हे शिक्षण घेतले.
तसेच लोणीकर यांनी २००४ आणि २००९ च्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष केल्याचे म्हटले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपण केवळ पाचवी उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
अगोदरच्या निवडणुकीत पदवीधर असलेले लोणीकर नंतरच्या निवडणुकीत केवळ पाचवी उतीर्ण कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.