www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद चांगलाच रंगला होता. अनेक राजकीय पक्षाकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. त्यामुळे स्मारकाबाबत सेनेनेही ताठर भुमिका घेतली. मात्र मुंबई महापालिकेने नोटीस बजावताच शिवसेने माघार घेतल्याचे समजते आहे. बाळासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेला चौथरा त्वरीत हटविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्मारकासाठी अन्यत्र जागा शोधण्यात येणार असल्याचेही कळते आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेनेला नोटीस बजावली आहे. तथापि, सहा डिसेंबरनंतर हा चौथरा व मंडप हटवण्यात येणार असल्याचे समजते. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक होईल, असे मनोहर जोशी आणि संजय राऊत यांनी आधी म्हटले होते. शिवाजी पार्क हे रामजन्मभूमी पेक्षाही आम्हांला पवित्र असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.
शिवाजी पार्क येथे फक्त अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे चौथरा व मंडप हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून शिवसेनेला नोटीस बजावण्यात आली आहे.