मुंबई : सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जोरदार निदर्शनं केली. दरम्यान, या मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमोनीयानं बाधित 3 महिन्यांच्या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टर मानसी पाटील यांना, मारहाण केली गेली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यावरुन तिच्या आई आणि आजीमध्ये वाद सुरु होता. त्यावर मध्यस्थी करायला गेलेल्या डॉक्टर मानसी पाटील यांना आमच्या भांडणात पडू नको असा दम देत, त्यांना मारहाण केली. गंभीर बाब म्हणजे या घटनेनंतर तब्बल 15 मिनिटांनंतर सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले.
या घटनेनं संतापलेल्या डॉक्टरांनी सायन रुग्णालयातल्या आवारातच जमिनीवर बसून निदर्शनं केली. परिसरातल्या इतर रुग्णालयांतल्या डॉक्टरांनी निदर्शनात सहभागी होऊन त्यांना साथ दिली. दरम्यान डॉक्टर मानसी पाटील यांना मारहाण केल्याच्या आरोपाचा संबंधित महिलेनं इन्कार केलाय
या घटनेनंतर सायन रुग्णालयाबाहेर तसंच आतमध्ये पोलीस तैनात केले गेले. दरम्यान रात्री 3 वाजेपर्यंत सायन रुग्णालयाच्या आवारात जमिनीवर बसून डॉक्टरांचं आंदोलन सुरुच होतं.
या सर्व गदारोळात सायन रुग्णालयात गर्भवती मुलीला दाखल करण्यासाठी आलेल्या तिच्या पालकांना ताटकळत बसावं लागलं. तर इतर रुग्णांना डॉक्टरांच्या अभावी निराश होऊन परतावं लागलं.
आपल्या मागण्यांवर आंदोलक डॉक्टर ठाम आहेत. देशभरातल्या डॉक्टरांचा त्यांना पाठिंबाही मिळतोय. मात्र या आंदोलनात भरडला जातोय तो सामान्य नागरिक. सततच्या होणा-या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यभरातल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.