www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या पेट्रोल पंपावर एखादी बेस्टेची बस डिझेल भरताना दिसली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, होय ना! पण आता लवकरच हे चित्र प्रत्यक्षात दिसणार आहे.
डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटी प्रमाणेच बेस्टनंही हा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारनं घाऊक खरेदी होणाऱ्या डिझेलवर प्रति लिटर १२ रूपयांनी वाढ केलीय. त्यामुळे बेस्टला ४३ कोटींचा बोजा दरवर्षी सहन करावा लागणार आहे. बेस्टच्या साडे चार हजार बसेसपैकी १२०० बसेस डिझेलवर धावतात. थेट पंपावर डिझेल भरलं तर तुलनेनं कमी किमतीनं बेस्टला डिझेल मिळणार आहे. त्यामुळे बेस्टचा तोटा कमी होणार आहे. म्हणूनच पुढच्या आठवड्यापासून मुंबईच्या पेट्रोल पंपावर बसेस डिझेल भरणार आहेत.
पण, या निर्णयामुळे मुंबईकरांचे कदाचित चांगलेच हाल होताना दिसतील. वाढत्या ट्राफिक समस्येबरोबरच बसेसच्या पेट्रोल पंपांवर रांगा लागल्यामुळे बराच वेळ प्रवासी लटकण्याची शक्यता आहे. तसंच बसेस बस स्टॉपवरही थोड्या उशिरानंच येण्याची शक्यता जास्त आहे.