मुंबई : अखेर मुंबईकरांचा बेस्ट बस प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे. बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोटा भरून काढण्याच्या नावाखाली प्रवाशांवर भार टाकण्यात आलाय. बेस्ट सात्याने दरवाढ करीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेय.
दोन रुपये दरवाढीच्या प्रस्तावासह बेस्टचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या बेस्टच्या अर्थसंकल्पाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. आता हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभागृहात मांडण्यात येणार आहे.
बेस्टचा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा ७१८५.५६ कोटीचा आणि ९४६.३२ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प बेस्टने जसा सादर केला तशाचा तसाच स्वीकारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये एक रुपया तर दुसर्या टप्प्यात एप्रिलमध्ये आणखी एक रुपया दरवाढ करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.
बेस्टला दीडशे कोटींचे अनुदान
बेस्टला महापालिका १५० कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे, मात्र हे अनुदान तिकीट दरवाढ रद्द करण्यासाठी नाही. तर बेस्टच्या ४३५ गाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. बेस्टला ४०० बसेस खरेदी कराव्या लागणार असून त्यासाठी १५० कोटींचे अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले.
विकास कर लावणार
बेस्टला आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून महापालिका विकासकांकडून घेत असलेल्या विकास करातील काही भाग बेस्टला कायमस्वरूपी देण्यासाठी विचार सुरू आहे. महापालिका सभागृहात त्याबाबत तशी मागणी करण्यात येणार असल्याचे फणसे यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.