www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भुजबळांचे वादग्रस्त ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणजेच विशेष कार्याधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. बेडसेंची पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) बदली करण्यात आलीय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बेडसेंवर आरोप केले होते. लाचखोर चिखलीकरचे बेडसे यांच्याशी जवळचे संबंध होते, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. बेडसेंच्या विनंतीनंतरच ओएसडी पदावरुन त्यांची बदली करण्यात आलीय. धुळे जिल्ह्यातल्या ‘साक्री’ या दुष्काळी तालुक्यात छडवेल-कोर्डे या गावचे रहिवासी असलेले संदीप बेडसे हे आधी पीडब्ल्यूडीमध्ये शाखा अभियंता होते. गेल्या काही वर्षांत छगन भुजबळ यांच्या संपर्कात आले आणि थेट भुजबळांचे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचं ग्रामस्थ सांगतात. भुजबळांच्या संपर्कात आल्यापासून आलिशान गाड्या आणि धुळे, नाशिक संपत्तीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतं. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतरच ही बदली का करण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
संदीप बेडसे यांची पार्श्वभूमी...
> संदीप त्र्यंबक बेडसे १९९९ च्या बॅचचे शाखा अभियंता
> नोकरीची सुरुवात घाटकोपर नंतर कल्याण त्यानंतर मंत्रालयात बदली
> मंत्रालयात देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी
> भुजबळांशी आठ वर्षांपासून संपर्कात
> पेठ, सुरगाणा भागात बदली होऊन डेप्युटेशनवर मंत्रालयात
> मुंबई, पुणे, नाशिक, धुळे येथे मालमत्ता
>स्वतःच्या नावावर बीएमडब्लू कार
> ११ मेपासून एसीबी मागावर
> तेलगी प्रकरणानंतर भुजबळ-अनिल गोटे भेटीचे सूत्रधार
> बेडसेंच्या सहकार्यानं सासऱ्यांच्याही मालमत्तेत वाढ
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.