मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे.
भाजपच्या या खेळीनं राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रचंड नाराजी आहे. मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपाने घटक पक्षांना डावललं होतं. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. तर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेऊन सरकारविरोधात रान उठविले आहे. सरकार शेतकऱ्यांची बाजू घेण्याआधी व्यापारांची बाजू घेत असल्याचे थेट आरोप शेट्टी यांनी केलाय.
तर दुसरीकडे आता विधान परिषदेवरही संधी मिळणार नसल्याने भाजपबरोबर येऊन आपल्या पदरात काय पडलं, असा प्रश्न घटकपक्षाच्या नेत्यांना पडलाय. एवढंच नव्हे तर महायुतीतून बाहेर पडण्याच्या त्यांच्या हालचाली सुरु असल्याचं समजत आहे. दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट बोलणे टाळलं आहे. आम्हाला याबाबत अद्याप काही कळलेलं नाही. त्यामुळे आम्ही काय बोलणार, अशी भूमिका त्यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.