राज ठाकरेंचा 'मोदी जोक' भाजपच्या जिव्हारी!

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवलीय. त्यामुळं भाजप नेते राज ठाकरेंवर चांगलेच खट्टू झालेत. कधीकाळी 'चाय पे चर्चा' करणाऱ्या राज आणि भाजप नेत्यांमध्ये त्यावरून मैत्रीपूर्ण सामना रंगू लागलाय.

Updated: Jul 12, 2014, 10:08 AM IST
राज ठाकरेंचा 'मोदी जोक' भाजपच्या जिव्हारी! title=
फाईल फोटो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवलीय. त्यामुळं भाजप नेते राज ठाकरेंवर चांगलेच खट्टू झालेत. कधीकाळी 'चाय पे चर्चा' करणाऱ्या राज आणि भाजप नेत्यांमध्ये त्यावरून मैत्रीपूर्ण सामना रंगू लागलाय.

अगदी कालपरवापर्यंत नरेंद्र मोदींची जाहीर स्तुती करणाऱ्या राज ठाकरेंनी आता वेगळाच सूर लावलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी चक्क पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या नरेंद्र मोदींची हवा कमी झालीय, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी केवळ मोठमोठी स्वप्नं दाखवतात, पण आश्वासनं पाळत नाहीत, असं सांगणारा जोक राज ठाकरेंनी यावेळी ऐकवला.
 

राज ठाकरेंचा 'मोदी जोक'...
पती अपनी पत्नी से -
बोलो तुम्हे क्या चाहिये, क्या लाके दू?
तुम्हे साडीयाँ लाके दू..? तुम्हे जेवर लाके दू..?
तुम्हे परदेस की सैर कराऊ? कहो तो तुम्हे मैं चाँद लाके दू..?
पत्नी पती से कहती है...
चल हट 'मोदी' कहीं के!

राज ठाकरेंच्या या जोकमुळं मनविसे कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पसरला. पण हा जोक भाजप नेत्यांच्या मात्र चांगलाच जिव्हारी लागलाय. मोदींची लोकप्रियता वाढतेच आहे. त्यांची लाट ओसरलेली नाही. राज ठाकरे विधानसभेत ते दिसेलच, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

तर नरेंद्र मोदींच्या बाजूनं किंवा विरोधात बोलणं ही सध्या राज ठाकरेंसारख्या राजकीय नेत्यांची अपरिहार्यताच बनलीय, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी बोलून दाखवली.

भाजपच्या ऑफिसात जाऊन 'चाय पे चर्चा' करणारे राज ठाकरे... शिवसेनेला वाकुल्या दाखवण्यासाठी 'कृष्णकुंज'वर जाणारे भाजप नेते... पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मैत्रीमध्ये दरार पडलीय की काय...? भाजप आणि मनसेचे मैत्रीपूर्ण संबंध आटत चालले की काय...? कालपर्यंत भरभरून स्तुती करणारे राज ठाकरे अचानक मोदींची फिरकी का घेऊ लागलेत..? राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.