भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक; होणार नव्या मुख्यमंत्र्यांची निवड

आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप विधिमंडळ नेत्याची म्हणजेच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे.

Updated: Oct 28, 2014, 03:29 PM IST
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक; होणार नव्या मुख्यमंत्र्यांची निवड title=

मुंबई : आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप विधिमंडळ नेत्याची म्हणजेच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला सर्व नवनिर्वाचित भाजप आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

शिवसेनेला हव्यास सहा जागा...

दरम्यान, शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपनेच आता काही अटी आणि शर्ती लागू केल्याचं समजतंय. शिवसेनेनं मागितलेली सहा प्रमुख खाती देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिलाय. एव्हढंच नव्हे तर शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या समावेशास भाजप तयार नसल्याचं कळतंय. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. यापुढं भाजपशी संपर्क साधायचा नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय.

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत केंद्रीय भाजप नेते राजनाथ सिंह आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन, मागण्यांचा प्रस्ताव सादर केल्याचं समजतं. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद तसंच काही मंत्रीपदांची मागणी भाजपकडं केलीय. एवढंच नव्हे तर ३१ ऑक्टोबरलाच शिवसेना मंत्र्यांचाही शपथविधी व्हावा, अशी गळ शिवसेनेनं भाजप नेत्यांना घातलीय... असं असलं तरी दुसरीकडे शिवसेनेनं बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी दर्शवल्याचा दावा भाजप नेते ओम माथूर यांनी केलाय. राष्ट्रवादीचा पाठींबा घ्यायचा की नाही हे भाजप ठरवेल मात्र शिवसेना हा भाजपचा स्वाभाविक मित्र असल्यामुळे सरकार स्थापनेसाठी प्रथम सेनेचा विचार केला जाईल असं ते म्हणालेत.

राष्ट्रवादी पाठिंब्यासाठी एका पायावर तयार...

भाजप सरकारला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनरूच्चार केलाय. राज्याला लगेच निवडणुकांना सामोरं जाणं परव़डणारे नाही, त्यामुळं स्थिर सरकार देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी योग्य ती पावलं टाकणार असल्याचं पवारांनी झी २४ तासशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच विधानसभेत विश्वासदर्शक घेण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित राहणार असल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय. दरम्यान, घोटाळे लपवण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरू असल्याची टीका शिवसेनेनं केलीय. तर यामुळे राष्ट्रवादीची जनमानसातली प्रतिमा डागाळल्याची टीका माणिकराव ठाकरेंनी केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.