मुंबई : राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात भाजपच्या कोट्यातल्या मंत्र्यांची नाव निश्चित झाल्याचं पुढे येतं. याशिवाय घटक पक्षांना काय काय मिळणार याविषयीही सविस्तर चर्चा झाली.
एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे या बैठकीला उपस्थित होते. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख या बैठकीत निश्चित होणं अपेक्षित होतं. पण उद्धव ठाकरे सध्या मुंबईबाहेर असल्यानं त्यांच्यासोबत औपचारिक चर्चा करून तारीख जाहीर होईल, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
या बैठकीत प्रत्यक्ष काय चर्चा आणि निर्णय झाला, याबाबत माहिती देणं भाजप नेत्यांनी टाळलंय. यापूर्वी झालेल्या सत्ताधारी घटक पक्षांच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नव्हता. मात्र झालेल्या चर्चेवर समाधानी असून भाजपनं दिलेलं आश्वासन पाळावं, अशी प्रतिक्रिया घटक पक्षांनी नोंदवलीय. भाजपनंही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केलाय.
घटकपक्षांनी खात्यांबाबत कोणताही आग्रह बाळगला नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सांगितलंय. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही वर्षभरात कधीही असमाधानी नसल्याचं स्पष्ट केलंय. रासपच्या महादेव जानकरांनीही अधिवेशनापूर्वी विस्तार होणार आणि मंत्रिपद मिळणार असा आशावाद व्यक्त केलाय. तर राज्यासह केंद्रातही मंत्रिपद हवं असा पुनरूच्चार रिपाइं खासदार रामदास आठवले यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.