www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या साजिद आणि आबिद शेख या दोघा मुलांना सीएम कोट्यातून घरे मिळालीत. डी. पी. सावंत यांच्या पत्नी रंजना सावंत यांनी स्वतःच्या नावावर दोन घरे घेतलीत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीरंग पाटणकर आणि सतीश देसाई यांनाही फ्लॅट मिळालेत.
येत्या २३ डिसेंबरपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करा, असे फर्मान कोर्टानं काढलंय.. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे दिल्याबद्दल केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हे निर्देश दिलेत. याआधीही शासनाने या आदेशाचे पालन केले नाही. आता शासनाला हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास अंतिम मुदत दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात शासनाने ही घरे मिळालेल्या राज्यभरातील सर्वांची नावे सादर करावीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. याप्रकरणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून एका अर्जदाराला एकच घर देण्याचा नियम आहे. मात्र या कोट्यातून एकाच अर्जदाराला वेगवेगळ्या वेळी दोन ते तीन घरे मिळाली आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. याची दखल घेत न्यायालयाने एप्रिल २०१२मध्ये या कोट्यातून एकापेक्षा अधिक घरे घेणार्यांची यादी देण्याचे व या लाभार्थींवरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी झाली नसल्याचे गेल्या आठवड्यात तिरोडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.