मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नागपूर मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याबाबतची भूमिका जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रम होणार आहे.
मुंबईतील कार्यक्रमादरम्यान झालेल्या टोलेबाजीनंतर आणि सोलापुरातील मुख्यमंत्र्यांविरोधी घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्री चव्हाण हे पंतप्रधानांसोबत नागपूर मेट्रो भूमीपूजनाला उपस्थित राहणार का हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नकार देत, पडदा पाडला आहे.
सोलापूर येथील कार्यक्रमात उपस्थित मंचावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची जुगलबंदी रंगली होती. तर दुसरीकडे हरियाणात झालेल्या एका कार्यक्रमात देखील मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबरच्या उदघाटन कार्यक्रमांना काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहावे. मात्र त्यानंतर राजकीय रॅलीला जाऊ नये,अशी सूचना काँग्रेसने आपल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलीय. पुणे असो की नागपूर, मेट्रो प्रकल्पाचं श्रेय्य काँग्रेस सरकारचंच आहे. मोदी सरकार हे श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.