मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

Updated: Dec 24, 2016, 10:45 PM IST
मुंबईकरांचं 'ख्रिसमस गिफ्ट'... आणि प्रचाराचं रणशिंग! title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी संपन्न झालं. मुंबईकरांसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांनी केलं. या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग भाजपनं फुंकल्याची चर्चा सुरू झालीय. 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन अखेर शनिवारी थाटामाटात संपन्न झालं. सुमारे 3600 कोटी रूपये खर्च करून अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या शिवस्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची माती आणि महाराष्ट्रातल्या नद्यांतून जमा केलेल्या पाण्यानं भरलेल्या कलशांचं मोदींनी अरबी समुद्रात जलार्पण केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मुंबईकरांना तब्बल एक लाख कोटी रूपयांचं ख्रिसमस गिफ्ट दिलं... मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं आखलेल्या विविध प्रकल्पांची भूमीपूजनं पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपन्न झाली. मेट्रो 3 आणि 4, शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू, एमयूटीपी 3 तसंच दोन उड्डाणपूल यांचा त्यामध्ये समावेश होता.

काळ्या धनाविरूद्ध लढाई सुरूच

काळ्या धनाविरूद्ध सुरू असलेली लढाई जिंकत नाही, तोपर्यंत ती सुरूच राहील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी बीकेसीतल्या भाषणात दिली. नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर जनतेला होणारा त्रास कमी होईल. पण बेईमान लोकांचा त्रास आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप VS शिवसेना

पंतप्रधानांच्या दिवसभराच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील त्यांच्यासोबत होते. पण तरीही भाजप विरूद्ध शिवसेना अशी कार्यकर्त्यांची राडेबाजी रंगली होती. दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी हाणामारीही झाली.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं भाजपनं महापालिका निवडणूक प्रचाराचा बिगूल वाजवल्याचं बोललं जातंय. पण या आश्वासनांवर मुंबईकर खरंच विश्वास ठेवणार का? महापालिका निवडणुकीचं घोडा-मैदान फार दूर नाही.