www.24taas.com,मुंबई
मुंबईतील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चावर पोलिसांनी आकाशातूनही नजर ठेवली होती. त्यासाठी पोलिसांनी रिमोटवर चालणाऱ्या कॅमेऱ्याची मदत घेतली होती, अशी माहिती आता पुढे येत आहे.
मुंबईतील सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्त मनसेने काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, राज यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मोर्चा काढलाच . वातावरण तापू नये म्हणून या मोर्चाला रोखण्यात आले नाही, असे जरी असले तरी या मोर्चावर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी हवेत तरंगणारा एक गुप्त कॅमेरा मुंबई पोलिसांनी आणला होता. त्या द्वारे पोलिसांनी बारीक हालचाली टिपल्या.
राज यांच्या मोर्चात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी हा कॅमेरा मुंबई पोलिसांनी आणला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ` हॉक आय व्ह्यू ` असे या कॅमेऱ्याचे नाव आहे. तो रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केला जातो. हा कॅमेरा ३६० अंशात फिरून फोटो काढू शकतो. तसेच आझाद मैदानावर लावण्यात आलेला हा कॅमेरा मनसेच्या मोर्चाचे आणि राज ठाकरे यांच्या सभेचे क्षणाक्षणाचे फोटो थेट पोलीस नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रुम ) मध्ये पाठवत होता, त्यामुळे कंट्रोल रूममधून पोलीस मोर्चावर लक्ष ठेवून होते. मात्र, खबरदारी म्हणून गिरगाव चौपाटीवर १५ हजार पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी होती.
राज्य राखीव सुरक्षा दलाच्या २० प्लॅटून तसेच रॅपिड अॅक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी तीन कंपनी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता . सुमारे १५ हजार पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले होते.