मुंबई : शिवसेना दिल्ली विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे. दिल्लीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
राज्याच्या राजकारणात शिवसेनेला भाजपने चांगलेच झुलविले. सत्तेत सहभागी करून घेण्यावरून मोठा खल झाला. शिवसेनेपुढे झुकायचं नाही, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली. चर्चा सुरु आहे, असे सांगून शेवटपर्यंत संभ्रम ठेवला. विश्वासदर्शक ठराव घाईघाईने जिंकून शिवसेनेला त्यांची जागा दाखविण्याची भूमिका बजावली. त्यानंतर सत्तेत सभागी करताना महत्वाची खातीही भाजपने आपल्याकडेच ठेवलीत. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे.
आपली नाराजी शिवसेनेने बोलून दाखविली नसली तरी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. त्यामुळे दिल्लीत भाजप विरोधात स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं उद्धव यांनी म्हटलंय.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना असल्याचे दाखवून दिले आहे. ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
ऊस दराच्या आंदोलनासाठी राजू शेट्टींनी आधीच सरकारविरोधात यल्गार पुकारलाय. त्यात मंत्रिमंडळात सामावून न घेतल्यानं राजू शेट्टी नाराज आहेत. त्यामुळं भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत नाराज शेट्टींना पुन्हा जवळ करण्याचा शिवसनेनं प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.