भुजबळ कुटुंबीयांची गोची; होणार खुली चौकशी!

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या खुल्या चौकशीचे मार्ग आता मोकळे झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी परवानगी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला) दिलीय. 

Updated: Feb 26, 2015, 08:20 PM IST
भुजबळ कुटुंबीयांची गोची; होणार खुली चौकशी! title=

मुंबई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि इतर भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या खुल्या चौकशीचे मार्ग आता मोकळे झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी परवानगी एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला) दिलीय. 

निवडणूक शपथपत्रात भुजबळ कुटुंबियांनी दाखवलेल्या संपत्तीबाबत आपच्या नेत्या अंजली दमानिया आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव खांडेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्य़मंत्री कार्यालयानं ही परवानगी दिली. महाराष्ट्र सदनात झालेल्या कथित घोटाळ्या प्रकरणी याआधीच भुजबळ कुटुंबियांची एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. आता अंजली दमानिया आणि संजीव खांडेकर यांनी जवळपास २ हजार ५२० कोटींच्या भुजबळांच्या मालमत्तेची यादी मुख्यमंत्री कार्यालय, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, पोलीस महासंचालक आणि एसीबीला सादर केली. या यादीत नाशिक, भायखळा, बांद्रा, सांताक्रूझ, येवला इथल्या मालमत्तांचा समावेश आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या नावे भुजबळांच्या मालमत्ता आहेत. तसंच नातेवाईकांच्या नावे स्थापन कंपन्यांच्या आधारे भुजबळांना महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासह इतरही महत्त्वाची कॉन्ट्रॅक्ट्स मिळाल्याचा आऱोप दमानिया आणि खांडेकर यांनी केलाय. 

 

तसंच, महाराष्ट्र सदन बांधकामाचं कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळांनी स्वत:च्या खाजगी कंपन्यांना भरगोस लाभ मिळवून दिला, असा आरोप करण्यात आलाय. या संबंधात भुजबळ कुटुंबीयांच्या चौकशीला सुरुवातही झालीय.

दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास 'राऊंड टेबल'  चौकशीही करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन, एमईटी, कोळसा घोटाळा, टोल नाका आणि इतर विषयांचा या चौकशीत समावेश होता.

 आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी एसीबीकडे भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत तक्रार दाखल केली होती. भुजबळ यांची कुठे आणि किती संपत्ती आहे याचा सगळा तपशीलही दिला होता. स्वत: भुजबळ, त्यांच्या पत्नी मीना, मुलगा पंकज, पुतण्या समीर भुजबळ आदींच्या नावे असलेली कोट्यवधी रुपये किंमतीची संपत्ती, त्यांच्याकडे असलेल्या गाड्या, सोने-चांदी, हिरे, बंगले, फ्लॅटस्, शेतजमिनी, भुजबळ कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या कंपन्या यांची विस्तृत माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.