इमारत दुर्घटना : डेकोटरेटरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2013, 07:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.
डेकोरेटर असलेल्या मेहतावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. अशोक मेहताने या इमारीतील काही भाग भाडेतत्ववर घेतला होता आणि या भागात त्यानं अनधीकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आलीय. त्याला आज शिवडी पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मात्र, यावेळी पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. अशोककुमार मेहताला कोर्टात आणताना आणि परत नेताना त्याचा चेहरा दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं?
मृतांचा आकडा ४१ वर...
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ४१ वर गेला असून ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जखमींचा आकडा ३० वर गेलाय. ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे.

मृतांच्या वारसांना एक लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तर उपचारांचा सगळा खर्च महापालिका करणार आहे. बचावकार्यादरम्यान दोन चिमुरड्यांनाही यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. फायरब्रिगेडचे आणि एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावाचे कार्य करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी महापालिकेची सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलीये. आठवड्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.