मुंबई : राज्यातील 40 हजार डॉक्टर संपावर, रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्टरांना मारहाण झाल्याचा निषेध म्हणून डॉक्टर चौथ्या दिवशी संपावर आहेत. कारवाई करण्याची ठोस मागणी त्यांनी लावून धरली आहे.
मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा सरकारचा दावा आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं फेटाळून लावलाय. मार्डशी आपलं बोलणं झालं असून त्यांनी संप मागे घेतला नसल्याचं आयएमएचे अध्यक्ष अशोक तांबे यांनी झी 24 तासला सांगितलंय. विशेष म्हणजे राज्यातील खासगी डॉक्टरांनीही मार्डच्या आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय़ घेतलाय.
त्यामुळं आजपासून राज्यातले तब्बल 40 हजार डॉक्टर संपावर जाणार आहेत. त्यामुळं खासगी रुग्णालयांतील रुग्णांनाही फटका बसणार आहे. तसंच रेडिऑलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट संघटनेनंही या संपाला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळं राज्यातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता असून रूग्णांचे अधिकच हाल होणार असल्याचं दिसंतय. महाराष्ट्रात आयएमच्या 2206 शाखा आहेत.