अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.
अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात ही माहिती दिली. जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं राज्याच्या वन खात्यातर्फे मंत्रालयाच्या तळमजल्यावर उद्या म्हणजेच ४ ऑगस्टला एक दिवसाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये जनतेला राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या एका कार्यक्रमात या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कटआऊट्स, पोस्टर्स, फायबरचे वाघ आणि बॅनर्स यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. एल.ई.डी.वर व्याघ्र संवर्धनाबाबत लघुपट आणि चित्रपटही यावेळी दाखवले जाणार आहेत.
वन्य संवर्धनासाठी सध्या कार्यरत असलेल्या हरित सेनेतील सदस्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. राज्यात ९६१७९ शाळा आहेत. प्रत्येक शाळेतील कमीतकमी दहा विद्यार्थी यात सहभागी होतील, असा प्रयत्न आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सुरू होणार्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक शाळेला सावली आणि फळे देणारी २० झाडे प्रत्येकी तीन रुपयांना देण्यात येणार आहेत. ताडोबा तसंच मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये फुलपाखरू उद्यान तयार करण्यात येणार असून संजय गांधी उद्यानात बिबट्या सफारी केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.