पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल

एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.

Updated: Mar 20, 2013, 12:34 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. याप्रकरणी कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर एपीआय सूर्यंवशींना मारहाण केली नाही, मात्र त्यांची वागणूक अरेरावीची असल्याचा दावा आरोप असणा-या आमदारांनी केलाय. या आमदारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
विधान भवन परिसरात एपीआय सचिन सूर्यवंशी यांची मारहाणीनंतर त्यांना थेट स्ट्रेचरवरुनच हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. विशेष म्हणजे कायदेमंडळात कायदा तयार करणा-या आमदारांनीच त्यांची ही अशी अवस्था केली.. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी टोलनाक्यावर झालेल्या वादानंतर विधानभवनात हा राडा झाला.. सूर्यवंशींविरोधात हक्क्भंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. त्यानंतर विधानभवनात क्षितीज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.. आणि त्यानंतर काही आमदारांनी घेरुन सूर्यवंशींची वाईट अवस्था केली.
विधान भवनाच्या मर्यादेलाच न शोभणारं हे कृत्य घडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.. यानंतर संतप्त झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी थेट विधानभवन गाठलं. पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आणि हिमांशू रॉय यांनी या मारहाणप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत खेद व्यक्त करत, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. तर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाचा निषेध करत, दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं.

दोषी आमदारांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी मारहाणीचे आरोप असलेल्या आमदारांनी एपीआय सूर्यवंशीच अरेरावी करत असल्याचं सांगत त्याचे पुरावे म्हणून सीडीही माध्यमांना दिली. क्षितीज ठाकूर यांनी झालेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत, दोषी आढळल्यास राजीनामा देईन अशी भूमिका घेतली. राम कदमांनी तर आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा केला.
आमदारांनी ते आम्ही नव्हेच अशी भूमिका घेतली असली तरी एपीआय सूर्यवंशींना मारहाण झाली हे कुणीच नाकारलेलं नाही. विधान भवनासारख्या कायदेमंडळात असं कृत्य करून आमदारांनी लोकशाहीचे धिंडवडे काढले. या प्रकरणी चौकशीनंतर कारवाई होईलही, पण लोकशाहीचं मंदिर असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला आमदारांनी काळीमा फासलाय ही बाब दुर्लक्ष न करण्यासारखी आहे.