मुंबई : निवासी डॉक्टरांच्या संपाविरोधात सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यामुळं मार्ड संघटना नरमली आहे.
कारवाईच्या भीतीने निवासी डॉक्टर सरकारबरोबर चर्चेला तयार झाले आहेत. मार्ड संघटनेचे प्रतिनिधी थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना भेटणार आहेत. त्यामुळे आजच संप मिटण्याची चिन्ह आहेत.
संपकरी निवासी डॉक्टरांनी रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, असं आवाहन, गिरीश महाजन यांनी केलं आहे.
इतकंच नाही तर, आज कामावर रुजू न झालेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल... त्यांचा सहा महिन्यांचा पगार कापला जाईल अशी तंबीच, गिरीश महाजन यांनी दिली आहे.
रुग्णांच्या जिवाशी खेळणं डॉक्टरांनी थांबवावं... सुरक्षेची मागणी एका महिन्यात पूर्ण केली जाईल, असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.
राज्यातल्या 16 हॉस्पिटल्सपैकी 12 सरकारी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टर संपामुळे जवळपास सगळ्याच सरकारी रुग्णालयांची सेवा प्रभावित झालीय.