नवी मुंबई : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान करण्याचं व्हीप आज शिवसेनेनंही जारी केलंय. मात्र या ठरावावर काय भूमिका असावी, याबाबतचा अंतिम निर्णय आपणच घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटंल आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या संमतीविनाच हा व्हीप काढला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांशी चर्चा करून मगच अविश्वास ठरावाबाबतची भूमिका ठरवण्यात येईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेनेच्या ३८ पैकी ३२ नगरसेवकांचा मुंढेंवर आणण्यात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावास विरोध आहे. पक्षाचे खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांनी व्हीप जारी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं शिवसेनेची अधिकृत भूमिका काय, याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.