www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘चित्रपटसृष्टीत पडद्यामागे कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या हातांसाठी मनसेनं काहीतरी करण्यासाठी पाऊल उचललंय... ते कौतुकास्पद आहे... आणि म्हणूनच राज ठाकरेंसोबत मी मनसे कार्यक्रमात हजेरी लावली’ असं बीग बी अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केलंय.
मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं नुकताच मुंबईत एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अनेक मराठी कलाकारांसोबतच बीग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. यानंतर ‘मनसेच्या व्यासपीठावर जाऊन राज ठाकरेंची भेट म्हणजे उत्तर भारतीयांशी गद्दारी’ अशी टीकेची झोड बीग बी यांच्यावर उठवली गेली होती. समाजवादी पक्ष व बहुजन समाजन पक्षाने याबद्दल राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चांगलीच टीका केलीय.
`कष्टकऱ्यांविषयी नेहमीच कमी चर्चा होते. त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नाही. चित्रपटसृष्टीत पडद्याच्या मागे अनेक लोक अथक परिश्रम करत असतात. चित्रपटांच्या यशामध्ये त्यांचा बरोबरीचा वाटा असतो. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होत असतील तर स्वागतार्ह आहे... चित्रपटसृष्टीतील कष्टकऱ्यांसाठी व्यक्तीगत पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर बरेच प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांना बळ द्यायलाच हवं. मनसेने यादृष्टीनं खूपच चांगलं काम केलं आहे आणि अशा कामांना माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे आणि राहील` असं बीग बी यांनी आपल्या टीकाकारांना खडसावून सांगितलंय.
मराठीचा अजेंठा हाती घेतल्यानंतर बिग बी यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांनी मराठीद्वेषी वक्तव्य केले होते. मी मराठी नाही तर हिंदीच बोलणार असं म्हटलं होतं. त्यावरून मनसे आणि बच्चन असा वाद पेटला. राज यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला होता. महाराष्ट्रात राहायचे असेल तर दुसऱ्या राज्याचे गुणगान गाऊ नका, असे बजावले होते. त्यामुळे बच्चन कुटुंबीय आणि मनसे दरी वाढली होती. मात्र, झालं गेलं गंगेला मिळालं, असं सांगून या कार्यक्रमात राज यांनी या वादावर पडदा टाकला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.