www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मंत्रिमंडळातून ज्या मंत्र्याला वगळायचं असतं अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो पण इथं एकत्रच सर्वच्या सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले आहेत. याबद्दल बोलताना पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्या गावचे’ अशी भूमिका घेतली पण सोबतच पवार म्हणतील तीच पूर्व दिशा हे त्यांनी अधोरेखित करून सांगितलंय.
लोकसभा निवडणुकीसाठी पवारांची ही तयारी असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रामधील ‘बार्गेनिंग पॉवर’ शरद पवारांना मजबूत करायचीय. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात पक्षाचे केवळ नऊ मंत्री आहेत तर लोकसभेच्या २२ जागा पक्षाकडे आहेत. राज्यातील मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागेल असे संकेत देत राज्यात पवारांनी राज्यातील मंत्र्यांना ‘दिल्लीची वाट धरावी...’ असा सल्ला दिला होता. पण, राज्यात रमलेले पक्षातले नेते मात्र केंद्रात जाण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षाचं हीत लक्षात घेऊन आज पवारांनी राज्यातील नेत्यांना आपली ‘पॉवर’ दाखवून दिलीय.
याबद्दल प्रतिक्रिया देताना, जितेंद्र आव्हाड यांनी ‘साहेब करतील ते योग्य करतील... शरद पवार यांच्या या निर्णयाची आपल्याला कुठलीही कल्पना नाही... मंत्रिमंडळातील फेरबदलाचे जे निर्णय आहेत ते संघटनेला विचारात घेऊन केले जात नाहीत. मंत्रिमंडळातील आणि पक्षातील जेष्ठ सदस्य यांच्याशी चर्चा करून पवारांनी हा निर्णय घेण्यात आला असू शकतो’ असं म्हटलंय.
सोबतच, ‘राष्ट्रवादीमधला कुठलाही नेता पवार साहेबांनी दिलेला आदेश धुडकावू शकत नाही, तेवढी हिंमत पक्षातील कोणत्याही नेत्याची नाही’ असं म्हणत शरद पवारांचाच शब्द अंतीम असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.