'लेडीज स्पेशल' @२५... रेल्वे नाही तर संस्कृती!

महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी लेडीज स्पेशल लोकल सुरू झाली... आज या लोकलला पंचवीस वर्षं पूर्ण झालीत... 'लेडीज स्पेशल' ही फक्त ट्रेन नाही तर ती एक संस्कृती आहे... लेडीज स्पेशलचा हा प्रवास फार रंगतदार आहे.

Updated: May 5, 2017, 03:14 PM IST
'लेडीज स्पेशल' @२५... रेल्वे नाही तर संस्कृती! title=

मुंबई : महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी लेडीज स्पेशल लोकल सुरू झाली... आज या लोकलला पंचवीस वर्षं पूर्ण झालीत... 'लेडीज स्पेशल' ही फक्त ट्रेन नाही तर ती एक संस्कृती आहे... लेडीज स्पेशलचा हा प्रवास फार रंगतदार आहे.

३ मे १९९२... विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली... तेव्हापासून  गेली पंचवीस वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय... आज ती पंचवीस वर्षांची झालीय. मुंबईच्या लोकल लाईफलाईन म्हणतात. ही लेडीज स्पेशल महिलांसाठी फक्त लाईफलाईनच नाही तर एक हक्काची मैत्रीण झालीय. विरार ते चर्चगेट या २८ स्टेशन्सच्या प्रवासात या ट्रेनमध्ये लाखो महिला चढतात आणि उतरतात... गेली पंचवीस सुखदुःखाच्या अनेक गोष्टी या लेडीज स्पेशलनं ऐकल्या. कारण या प्रवासात महिला एकमेकांशी हक्कानं व्यक्त होतात.

 

मुंबईत नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणात रोजगार खुले झाले... आणि याचवेळी महिलाही चूल आणि मूल सोडून घराबाहेर पडायला लागल्या. त्यावेळी नोकरीची सगळी ठिकाणं ही दक्षिण मुंबईत केंद्रीत होती. सकाळी लोकल पकडायची म्हणजे मोठी कसरत होती. फक्त दोनच डबे महिलांसाठी राखीव होते... त्यात जीव मुठीत धरून चढावं लागत होतं... त्याचवेळी लेडीज स्पेशल लोकल सुरू करावी, अशी संकल्पना पुढे आली.

निवांत गुजगोष्टी...

घर सोडून नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी ही लेडीज स्पेशल अतिशय फायद्याची ठरली. सकाळी लोकल पकडायच्या आधी तिचा सगळा वेळ स्वयंपाक आणि मुलं यांच्यामध्येच जात होता. सकाळी उठल्यापासून तिला दोन क्षण बसायलाही वेळ मिळत नव्हता... पण या लेडीज स्पेशलमुळे सगळ्या महिलांना हक्काची सीट मिळाली... नोकरी करणाऱ्या महिलांबरोबरच भाजी विकणाऱ्या, मासे विकणाऱ्या मावशींचीही चांगली सोय या लेडीज स्पेशलनं केली. 

लेडीज स्पेशल लोकल म्हणजे महिलांसाठी दुसरं घर झालं... सकाळच्या घाईगडबडीत राहून गेलेली देवभक्तीही लेडीज स्पेशलमध्ये करता येते. बघता बघता लेडीज स्पेशलचं हे कुटुंब वाढत गेलं. लेडीज स्पेशलमध्ये अनेक ग्रुप झाले... महिलांचं एकमेकींशी शेअरिंग वाढलं, सासू-सूनेबद्दलच्या लेकी-जावयाबद्दलच्या गप्पा वाढल्या... सुखाच्या गुजगोष्टी होतात.... तसे कधीतरी एकमेकींशी दुःख वाटताना डोळेही पाणावतात.... पण लेडीज स्पेशलमध्ये खऱ्या अर्थानं दोन क्षणांचा निवांतपणा मिळतो.

सोहळे आणि भांडणंही

स्टेशन्स मागे पडत जातात, तसतसा हा प्रवास आणखी रंगतदार होत जातो... गप्पा रंगतात, गप्पांबरोबर गाण्याच्या भेंड्याही रंगतात... एक लेडीज स्पेशल ट्रेन सुखदुःखांबरोबरच बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण करते. मुंबईचा माणूस मुळातच उत्सवप्रिय... हीच उत्सवप्रियता लेडीज स्पेशलमध्येही पाहायला मिळते... ऑफिसला जाण्याआधी वडापावची पार्टीही इथे रंगते... आणि ख्रिसमसचे सेलिब्रेशनही होतं. हळदीकुंकू, दहीहंडी, दिवाळी असे सगळे सण ही लेडीज स्पेशल साजरी करते... भिशी पण चालवली जाते. अगदी डोहाळजेवणाचे सोहळेही लेडीज स्पेशलमध्येच केले जातात. पण त्याही पुढे जात या लेडीज स्पेशलनं अनेक बाळंतपणंही केलीत.

'लेडीज स्पेशल' ट्रेन म्हटली की भांडणंही आलीच... इथली भांडणं बहुतेक करुन सीटवरुन... या ट्रेनमध्ये क्लेम नावाची एक संकल्पना आहे.... ज्या क्लेमवरुन अगदी एकमेकींच्या झिंज्याही उपटल्या जातात.

अनेक गोष्टींची देवाण-घेवाण

संध्याकाळी चर्चगेटहून सुटलेली 'लेडीज स्पेशल' हा महिलांसाठी दिवसभरातल्या धावपळीनंतरचा मोठा दिलासा असतो... ऑफिसमधून काम करुन थकल्यावर विश्रांती मिळते ती इथेच... अर्थात तो असतो एक छोटासा ब्रेक... कारण घरी परत गेल्यावर काम करायला तिलाच पदर खोचून उभं राहावं लागतं... त्याची तयारीही ती लेडीज स्पेशलमध्येच करते... इथेच भाज्या मिळतातही आणि निवडूनही होतात.

लेडीज स्पेशलनं अनेकांना मायेची ऊब दिलीय... कारण या पंचवीस वर्षांच्या प्रवासात आजपर्यंत अनेकांचे स्वेटर्स या लेडीज स्पेशलमध्ये विणून झालेत... नव्वदीच्या दशकात लोकरीच्या धाग्यात गुंतलेले हे हात आता मोबाईलमध्ये गुंतलेत.... एवढा बदल काळानुसार झालाय... पण त्या गप्पा, गाणी आणि एकमेकींबरोबरचं शेअरिंग अजूनही तसंच आहे.

'लेडीज स्पेशल'ची प्रेरणा

ही लेडीज स्पेशल अनेक सुखदुःखाच्या क्षणांची साक्षीदार आहे... पश्चिम रेल्वेवर सुरू झालेली ही लेडीज स्पेशल नंतर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर मार्गावरही सुरू झाली... त्यानंतर लेडीज स्पेशल बसेसही सुरू झाल्या... तामिळमधल्या एका मासिकाचं नावही याच लेडीज स्पेशलवरुन ठेवण्यात आलं... लेडीज स्पेशल नावाची मालिकाही टीव्हीवर आली... आणि आमचं बातमीपत्र 'लेडीज स्पेशल' या नावाची प्रेरणाही या लेडीज स्पेशल लोकलवरुनच मिळाली... अशी ही अनेकांना प्रेरणा देणारी लेडीज स्पेशल आज ५० वर्षांची झालीय... यापुढचाही तिचा प्रवास असाच सुसाट आणि आनंदात सुरू राहणार आहे.