प्रेयसी मित्रांबरोबर बोलत असल्याने तिच्या मुलाला रेल्वेतून फेकले

 जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली. प्रेयसी आपल्या मित्रांबरोबर बोलत असल्याचा राग आल्याने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करुन प्रियकराने धावत्या रेल्वे लोकलमधून त्याला फेकून दिले.

Updated: Jan 29, 2015, 11:13 AM IST
प्रेयसी मित्रांबरोबर बोलत असल्याने तिच्या  मुलाला रेल्वेतून फेकले title=

मुंबई :  जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली. प्रेयसी आपल्या मित्रांबरोबर बोलत असल्याचा राग आल्याने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करुन प्रियकराने धावत्या रेल्वे लोकलमधून त्याला फेकून दिले.

प्रेयसीचे मित्रांशी होणारे बोलणे आवडत नसल्यामुळे प्रियकर संदीप सहदेव बेहरे याने तिच्या चार वर्षांच्या मुलाला रविवारी रात्री फिरायला घेऊन जातो, असे सांगून त्याचे अपहरण केले. या मुलाला जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेसमोर फेकून दिले. यामध्ये चिमुरड्याला आपला उजवा हात गमवावा लागला. त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

संदीप हा खार येथे राहतो. तो इस्टेट एजंट म्हणून काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली. मालाड येथे एका पाड्यात ती मुलासोबत राहते. यादरम्यान संदीपशी तिचे प्रेमप्रकरण सुरु झाले. 

मात्र, ती आपल्या मित्रांशी गप्पा मारीत असे, हे संदीपला आवडत नसे. मित्रांशी बोलू नको, असा संदीपने तिला दमही दिला होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. रविवारी संदीप मालाड येथे तिला भेटायला आला, याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादानंतर त्याने मुलाला फिरायला नेतो असे सांगून तो घेऊन गेला आणि त्याने चक्क मुलाला रेल्वेसमोर फेकून दिले.

काही वेळाने संदीपने तिला रेल्वे अपघातात मुलगा जखमी असल्याचे कळविले. बोरीवली रेल्वे पोलिसांनी संदीपला चौकशीसाठी ताब्यात घेतले. संदीपनेच मालाड येथून चर्चगेट लोकल पकडून मुलाला जोगेश्वरी स्थानकात आणले. त्यानेच त्या मुलाला लोकलखाली फेकून दिल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संदीप बेहरेला अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.