www.24taas.com,मुंबई
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दादा गेले. आता लवकरच मुख्यमंत्री बाबाही जाणार हे निश्चित, असे भाकीत करतानाच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी करत २०१४ साली हे ‘आघाडी’चे सरकार जाऊन महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, असे सांगितले.
एल्फिन्स्टन येथे कामगार स्टेडियमवर रिपाइंच्या ५५वा वर्धापनदिन कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे व्यासपीठावर होते. काँग्रेस सरकारवर टीका करताना आठवले म्हणाले, भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या राज्यात सर्वसामान्य जनतेला जीणे महाग झाले आहे. महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेला न्याय द्यायचा असेल तर हे सरकार कुठल्याही परिस्थितीत बदलले पाहिजे. वीसएक हजार रुपये पगारातही आता चार माणसाचं कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. जनता उपाशी आणि भ्रष्टाचारी नेते तुपाशी असा आघाडीच्या सरकारचा कारभार आहे.
उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महायुती आपल्या ताकदीच्या जोरावर पुन्हा सत्ता काबीज करील. सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते आता जोरजोरात बोलत फिरताहेत असे सांगतानाच एवढे धाडस त्यांच्यात कशामुळे आले? मंत्रालयात लागलेल्या आगीत घोटाळ्याच्या फायली जळून गेल्या की काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. अजित पवार यांच्या डोक्यावर आरोपांचा नागोबा वेटोळे घालून बसलाय. त्यांच्या धाडसाचा संबंध मंत्रालयाच्या आगीशी नाही ना? कारण आम्ही या आगीचे राजकारण केलेले नाही. एवढे घोटाळे होताहेत, पण हे निर्लज्जम सदा सुखीसारखे वागताहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सध्या महाराष्ट्रात दादा-ताईंचे रक्षाबंधन जोरात सुरू आहे, असा टोला लावून उद्धव ठाकरे हाणला. ताई म्हणताहेत, दादा तुम्ही महाराष्ट्र सांभाळा. मी दिल्लीत बरी आहे. अरे तुम्हाला दिल्ली, महाराष्ट्र आणि देश आंदण दिलाय का, असा सवाल उद्धव यांनी केला. आता काँग्रेसवाले लोक निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पैसा वाटतील. त्यासाठी मजबुतीने सामना करायचा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.