www.24taas.com,मुंबई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गडकरींनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचही माणिकरावांनी सांगितलंय.
गडकरींनी आपल्यावर नैराश्यातून आरोप केल्याचा टोला माणिकरावांनी हाणलाय.गडकरींनीच कारखाना उभारण्याच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केल्याचा प्रतिहल्ला माणिकरावांनी गडकरींवर केलाय. त्यामुळं माणिकराव आणि गडकरींमध्ये जोरदार जुंपण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.
गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या पाठिशी पक्ष ठामपणे उभा राहिल्यानंतर त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच नागपुरात त्यांचं काल जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यानंतर गडकरींनी आरोप करणा-यांना जशास तसे उत्तर देऊ अशी गर्जना केली.
माणिकराव ठाकरेंवर यवतमाळ जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे २३ लाख रुपये बुडवल्याचा आरोप घणाघाती आरोप केला. माणिकरावांच्या कारखान्याला दिलेल्या ऊसाची देयके संबंधित शेतक-यांना दिली नसल्याचा आरोप गडकरींनी केला. माणिकराव ठाकरेंनी मात्र गडकरींनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. मात्र, आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन गडकरींवर जोरदार टीका केली. त्यांना कोर्टात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.