मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. घुमान संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची कर्मभूमी आहे.
घुमान हे पंजाबमधील गुरूदासपूर जिल्ह्यात आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेर होणार आहे.
आजच्या पंजाब , हरयाणा , दिल्ली , हिमाचल प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश तसेच पाकिस्तानातही नामदेवांची मंदिरं उभी आहेत. संत नामदेव हे बहुभाषिक कवी होते.
जिथे गेले तिथली बोली स्वीकारली. गुजरातीत लिहिले , खडी बोलीत लिहिले , पंजाबीतही लिहिले. सर्वत्र जात राहिले , गात राहिले आणि लोकांची जीवनं बदलत राहिले.
ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्यापूर्वी त्यांनी नामदेव आणि आपल्या भावंडासह उत्तरेची यात्रा केल्याचं सांगितले जातं. पण माऊलींनी १२९६ मध्ये समाधी घेतल्यानंतर नामदेवांनी खर्या अर्थाने महाराष्ट्र सोडला. त्यांनी आधी दक्षिणेच्या आणि नंतर उत्तरेकडील यात्रा केल्या. काशी, पुष्कर, हरिद्वारला असताना त्यांना दिल्लीच्या बादशाहाने कैद करून दरबारात नेले. तेथे मेलेली गाय जिवंत करण्याचा किस्सा सांगतात. तेथून नामदेव महाराज पंजाबातील भूतविंडमध्ये आले.
आपण ज्याला पाण्याचा पाट म्हणतो, इथे नहर म्हणतात. त्याच्या आसपास ते कीर्तन-भजन करत. त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. अशाच प्रवचनांमधून आणि कीर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसनं याविषयी लोकांचं प्रबोधन केले. लोकांना त्यांच्याच भाषेतून समजावून सांगितलेल्या विचारांमुळे नामदेवांचा भक्तपरिवार वाढत गेला.
याच भूतविंडमध्ये त्यांना बोहरदास हा शिष्य मिळाला. इथून नामदेव महाराज मर्डी किंवा मरड या गावात गेले. तेथे बोहरदासांचं लग्न लावून दिलं, असं सांगतात. मरडवरून ते या भट्टिवाल गावात आले. तेव्हा पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. लोक पाण्यासाठी हाल सहन करत होते. नामदेवांनी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केले आणि पाण्याचा दुष्काळ संपला. भट्टिवाल आणि आसपासच्या सखोवाल, धारिवाल या गावांमध्ये बाबा नामदेवांना मानणा-यांची संख्या वाढू लागली. आजही त्याच्या कित्येक खाणाखुणा सापडतात.
इथे आल्यानंतर त्यांनी या गुरुदासपूर जिल्ह्यालाच आपल्याला कर्मभूमी म्हणून निवडलं आणि अखेरपर्यंत इथेच राहिले. शेवटची काही वर्षे ते भट्टिवालच्या शेजारीच असलेल्या जंगलात राहण्यासाठी गेले. बोहरदासासह शिष्यपरिवार त्यांच्यासोबत होता. त्या जंगलात नामदेवांच्या निवासस्थानामुळे लोकांचे येणं-जाणं वाढलं. हळूहळू काही भक्त तेथेच आसपास राहूही लागले. बघताबघता त्या जंगलाचं रुपांतर एका गावात झालं. त्याचं नाव घुमान. आजही नामदेवांनी वसवलेलं गाव म्हणून घुमानची ओळख आहे. याच घुमानमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला असा इथल्या लोकांचा विश्वास आहे.’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.