गुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं

गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.

Updated: Dec 26, 2014, 08:30 PM IST
गुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं title=

मुंबई : गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.

गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा नारा ?
मराठी भाषिकांची करण्यात येतेय कोंडी ?
महाराष्ट्र-गुजरातचे नेते आता काय भूमिका घेणार ?

शशिकांत शिवाजी फडतरे....मूळचे सातारा जिल्ह्यातल्या वाकेश्वर गावातले फडतरे दागिंन्यांना पॉलिश करुन देतात.व्यवसायाच्या निमित्तानं सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपली पत्नी आणि भावासह गुजरातमधील गोधरा गाठलं..तिथे त्यांनी आपलं दुकानही थाटलं.

सगळं काही सुरळीत सुरु असताना गेल्या काही दिवसांपासून त्यांना विचित्र अनुभवांना सामोरं जावं लागतंय.स्थानिक भाषकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचं  रुपांतर हळूहळू मोठ्या राड्यात झालंय.त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात खोट्या केसेस टाकून त्यांना मारहाणीची धमकी देण्यात आल्याचं फडतरेंचं म्हणणं आहे.त्यांना गाव सोडण्यास दबाव टाकण्यात आला.

छळवणूकीला कंटाळून अखेर दोन महिन्य़ांपूर्वी फडतरेंनी आपलं राहतं घर, गाळा सोडला. जीव वाचवण्यासाठी ते एका रात्री कुटुंबिय आणि मराठी कारागिरांसह महाराष्ट्रात परतले. सध्या ते साताऱ्यातल्या गावी आहेत. गोध्रात असलेली सुमारे सत्तर लाखांची मालमत्ता अगदी मामूली किंमतीत विकण्यासाठी त्यांच्यावर तेथील स्थानिक व्यापारी दबाव टाकत असल्याचं फडतरे सांगतात.

मूळगावी परतल्यानंतर त्यांनी सारी आपबिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनाही सांगितली. त्यानंतर मनसेही फडतरे कुटुंबियांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिलीय.

प्रादेशिक अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रात परप्रांतियांविरोधात राडा करणारी मनसे आता मराठी भाषकावरील अन्यायाविरोधात आवाज उठवतेय. गुजरातमधील या प्रकरणात मनसेला घ्यावी लागलेली भूमिका हा काव्यगत न्यायच म्हणायला हवा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.