शिवसेनेला मराठीचं वावडं! मनसेची टीका

मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीमध्ये मजकूर छापला आहे. मनसेनं ही संधी साधत शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 3, 2013, 07:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीमध्ये मजकूर छापला आहे. मनसेनं ही संधी साधत शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीचा मुद्दा अजेंड्यांवर ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण करत शिवसेना मराठी माणसाच्या मनामनात रुजवली. परंतु आता राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेलाच मराठीचं किती वावडं आहे. हे ताडदेव इथल्या शिवसैनिकांनी दाखवून दिलंय. इथल्या शिवसेनेच्या शाखा क्रमांक 212नं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीतून पत्रक छापलंय. शाखाप्रमुख किरण बाळसराफ यांनी आपल्या लेटरपॅडचा यासाठी वापर केलाय. पत्रकाच्या वरच्या भागात मराठीत आपली माहिती आणि खाली मजकुरात मात्र एकही मराठी शब्द न वापरता इंग्रजीमध्ये मजकूर. वर्षभरात केलेल्या कामाचा आढावाही त्यांनी इंग्रजीमध्येच घेतलाय. ताडदेव भागात अमराठी लोक जास्त असल्यानं इंग्रजीत पत्रक छापल्याची सारवासरव शाखाप्रमुखांनी केलीय.

मराठीच्या मुद्यावरुन शिवसेनेशी लढणा-या मनसेच्या हातात यानिमित्तानं आयतंच कोलीत मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ज्या मराठी अंजेंड्यासाठी शिवसेना प्रसिद्ध होती, त्या हेतूलाच हारताळ फासण्याचा हा प्रकार असल्यानं सामान्य शिवसैनिकांत नाराजीची भावना आहे. मराठीच्या भल्यापेक्षा राजकारणासाठी अमराठी लोकांना कुरवाळण्याच्या अशा प्रकारामुळंच मनसेला मराठीचा मुद्दा हायजॅक करण्यात यश येतंय.