मुंबई : मराठीची अस्मिता जपण्यासाठी आणि मराठी माणसाला न्याय देण्याचा दावा करणाऱ्या मनसेने अवघ्या २० दिवसांच्या आत पक्षाचा झेंडा दुसऱ्यांदा बदलला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या भूमिकेमुळे नवी चर्चा सुरु झालेय.
महाराष्ट्र दिनासाठी आता खास नवा झेंडा मनसेचा असेल. या आधी शिवजयंतीसाठी नवा झेंडा तयार केला होता. अखंड महाराष्ट्र असंही या झेंड्यावर लिहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र तोडणाऱ्यांना चपराक देण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने करीत आले आहेत. त्यांनाच या झेंड्यातून इशारा देण्याचा मनसेचा प्रयत्न दिसत आहे.
महाराष्ट्र दिन काळा दिन साजरा करणाऱ्यांना झेंड्याच्या नव्या लूकमधून उत्तर देण्यात येईल, असे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनसेने दुसऱ्यांदा झेंड्यात बदल केल्याने संभ्रम होईल, असे जाणकारांचे मत आहे.