www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एखादी ट्रेन उशिरा असेल किंवा रद्द झाली असेल तर? असा प्रश्न अनेकवेळा तुमच्या समोर येतो. त्यावेळी तुम्ही चिंतीत होता. कधी तर तुम्ही वाकून ट्रेन आली का, याची वाट पाहता. मात्र, ही चिंता मिटली आहे. कारण रेल्वेने तुमच्यासाठी रेल्वेचे अपडेट्स देण्याचा फंडा शोधून काढलाय. त्यामुळे नो टेन्शन.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही अधिक स्मार्ट होता. तसाच स्मार्टनेस मुंबईच्या लोकल ट्रेनने केला आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे गाड्यांचे अपडेट्स थेट मोबाईलवर पाहायला मिळू शकतात. त्यासाठी मध्य रेल्वेने मेनलाईन सेवांचे अपडेट्स आपल्या संकेतस्थळावरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे मध्य रेल्वेच्या जवळपास ८२५ मेनलाईन लोकलचा येण्याची आणि सुटण्याची खरी वेळ तुम्ही पाहू शकणार आहात. स्मार्टफोन आणि कम्प्युटरवर तुम्हाला याची माहिती मिळू शकणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या http://www.trainenquiry.com : या वेबसाईटवर लॉगईन करावे लागेल. तसेच या साईटवर देशभरातील रेल्वेचे रनिंग स्टेटस पाहता येतील.
यासाठी युझर्सना स्टेशन नाव किंवा कोड वेबसाईटवर एन्टर करावं लागेल. त्यानंतर दोन तासांमध्ये सुटणाऱ्या रेल्वेची यादी असलेलं पेज ओपन होईल. त्यापैकी एका नावावर क्लिक करुन युझर्सना माहिती हव्या असलेल्या ट्रेनचं रनिंग स्टेटस आणि किती वेळात ट्रेन स्टेशनवर पोहोचेल, याबाबत माहिती मिळेल.
तसेच लोणावळा-सीएसटी आणि इगतपुरी-सीएसटी यामधील सबअर्बन नेटवर्क सिलेक्ट केल्यावर वेबसाईटवर रिअल टाईम अपडेट दिसू शकतील. अपडेट्स http://www.trainenquiry.com या वेबसाईटवर स्टेशन ऑप्शन निवडा आणि तुम्ही शोधत असलेलं स्टेशन एन्टर करा. त्यानंतर दोन तासांत सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेची माहिती देणारी यादी समोर येईल. त्यानंतर हवी असेलेली सेवा निवडा आणि तुम्हांला संबंधित स्टेशनवरुन सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व गाड्यांचं स्टेटस कळू शकेल.
तुम्ही रेल्वेने प्रवासाला निघाला आहात आणि जर घाईत असाल तर तुमची रेल्वे कुठपर्यंत पोहोचली आहे हे जाणून घेणं आता शक्य होणार आहे. कारण रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी गुगल मॅपच्या आधारे एक चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेने गुगल मॅपच्या आधारावर रेलरडार नावाची वेबसाइट सुरु केली आहे. http://railradar.trainenquiry.com या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही प्रवास करणार असणाऱ्या रेल्वेचं लोकेशन कळण्यास मदत होणार आहे. देशभरातील सुमारे ६५०० रेल्वेच्या योग्य स्थानाची माहिती या वेबसाइटद्वारे मिळणार आहे.
या वेबसाइटवर गेल्यास डाव्या बाजूला सर्च ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर रेल्वेचं नाव, नंबर एन्टर करा किंवा स्टेशन्स ऑप्शनवर स्थानकाचं नाव लिहा आणि गो म्हणा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या मॅपवर रेल्वेचं स्थान दिसेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.