महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून मोदींचे छापणे चुकीचे - शिवसेना

चरख्याच्या जवळचे महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. आता भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही टीका केली आहे.

Updated: Jan 14, 2017, 12:04 AM IST
महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून मोदींचे छापणे चुकीचे - शिवसेना title=

मुंबई : चरख्याच्या जवळचे महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्यानंतर टीका होऊ लागली आहे. आता भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही टीका केली आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मोदींच्या फोटोवरून टीका केली आहे. माणूस स्वतःच्या प्रेमात पडला की काय घडतं याचं उत्तम उदाहरण हे आहे. खादी ग्राम उद्योगाचं बीज आणि उत्कर्ष म्हणजे महात्मा गांधी. त्यांना दूर करणं जसं लोकांना संतापजनक वाटतं तसंच ते आक्षेपार्ह्य सुद्धा आहे, असे अरविंद सावंत म्हणालेत.

अशा चुका इतक्या मोठ्या माणसाकडून होऊ नये. फोटो काढून घरात ठेवला तर चाललं असतं पण कॅलेंडरवर छापणं चुकीचं आहे. चोऱ्या कशा होऊ शकतात त्याचं हे उदाहरण आहे. मतांच्या चोऱ्या, विषयांच्या चोऱ्या, कामांच्या चोऱ्या होऊ शकतात. याबाबत जनतेने सावध होणं गरजेचं आहे. हे फारच गंभीर आहे. हे शोभणारं नाही असं निश्चितपणे वाटते, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी टीका करताना व्यक्त केली.

दरम्यान, खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच, कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी निषेध आंदोलन केले. आमचा पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला विरोध नाही, तर गांधीजींचा फोटो हटवला याला आक्षेप आहे. असे कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. देशभरात सोशल मीडियावरूनही या फोटोवर आक्षेप घेतला जातो आहे.