मुंबई : मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले तर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या १० दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले येथे साखळी स्फोट झाले होते. त्याप्रकरणी आज टाडा कोर्टाने निकाल सुनावत १० आरोपींना पोटा, शस्त्रास्त्रे कायदा, रेल्वे कायद्याअंतर्गत दोषी ठरवले. मात्र, नदीम पालोबा, हरून लोहार आणि अदनान मुल्ला या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष करण्यात आली.
अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटांनी मुंबईकर हादरले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या इमारतीतील मॅकडोनाल्ड्समध्ये ६ डिसेंबर २००२ रोजी पहिला स्फोट झाला तर २७ जानेवारी २००३ साली विलेपार्ले पूर्वेकडील गजबजलेल्या मार्केटमध्ये दुसरा स्फोट झाला.
तिसरा आणि शेवटचा स्फोट १३ मार्च २००३ रोजी मुलुंड स्थानकातील गर्दीने भरलेल्या कर्जत लोकलमध्ये झाला. या तिन्ही स्फोटांमध्ये १२ जण ठार २७ जण गंभीर जखमी झाले होते.