मुंबई : येथील विमानतळ परिसरातील नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेली इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
सायली डेव्हपर्स प्रा. लि.ची इमारत विमान उड्डाणाच्या मार्गात अडथळा ठरत असल्यामुळे न्यायालयाने ही इमारत पाडण्याचे आदेश दिले. तसेच ४८ तासांमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा नोंदवण्याचेही बजावले आहे. विमानतळ परिसरात १९ मीटरपर्यंत बांधकामास परवानगी आहे. मात्र, या विकासकाने ३४ मीटरपर्यंत बांधकाम केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला इमारत पाडण्याचे आदेश देताना उंच टॉवर्समुळे प्रवाशांच्या जीवाशी होणाऱ्या खेळाशी विकासक वा हवाई प्रवाशांशी संबंधित यंत्रणा, सरकार अशा कुणाला काही पडलेले नाही, याबद्दल न्यायालयाने फटकारले.
या इमारतीच्या विकासकाने उच्च न्यायालयाकडू यापूर्वी इमारत जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती. या इमारतीमुळे भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी न्यायालयाने इमारत जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला दिलेली स्थगिती माघारी घेतली.
नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमान लिमिटेड (एमआयएएल) यांना इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात ४८ तासांत गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने सांगितले.