मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळं वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर संक्रांत कोसळलीय.
पुढील दोन महिन्यात मुंबई महानगरपालिकेने याबाबतची कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश हायकोर्टाने दिलेत. ३१ जानेवारी २०१६पर्यंत यासंदर्भात पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं हायकोर्टाला आपला अंतिम अहवाल सादर करावा, असंही न्या. अभय ओक यांनी स्पष्ट केलेय.
दरम्यान, याबाबतची पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे. आरटीआय कार्यकर्ता भगवानजी रयानी आणि अन्य काही याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. विलेपार्ले पश्चिम येथील गुलमोहर सोसायटीच्या जंक्शनवर फेरीवाल्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
या फेरीवाल्यांकडे खाण्यासाठी येणारे लोक आपल्या गाड्या कशाही पार्क करतात. अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.