www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.
आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार करणार्या शीतल म्हात्रे यांच्यासाठी विरोधी पक्ष धावून आले आहेत. या प्रकरणावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याचा विरोधी पक्षांचा आग्रह आहे. विरोधी पक्षातील महिला सदस्यांना पुढच्या बाकावर बसण्याचा मान देत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निवेदन वाचण्यास सुरुवात केली. हाच मुद्दा उचलून धरीत विरोधी पक्षनेते पुढच्या बाकावर आले तरच निवेदन करण्याची अनुमती देण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी घेतली. आणि गोंधळाची परीस्थिती झाली.
विरोधी पक्षांनी महापौरांना न जुमानता गोंधळातच निवेदन केले. दरम्यान, शिवसेना सदस्यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शिट्या वाजविण्यास सुरुवात केली. याची दखल घेत महापौरांनी काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी, नूरजहाँ रफीक, पारुल मेहता, प्रवीण छेडा आणि मनसे गटनेता संदीप देशपांडे यांना दिवसभरासाठी पालिकेच्या कामकाजातून निलंबित केले.
म्हात्रे यांना न्याय मिळेपर्यंत हा विरोध असाच कायम राहील, असे राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले. सभागृहातील गोंधळाचे मोबाइलवरून रेकॉर्डिंग करणार्या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा फोन जप्त करण्याची ताकीद महापौरांनी दिली. मात्र, महापौर दालनात असुरक्षित नगरसेविका तक्रार करीत असल्याचे रेकॉर्डिंग करणार्या नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना महापौरांनी समजही दिली नव्हती. याकडे लक्ष वेधत घोसाळकरला वेगळा न्याय का, असा सवाल काँग्रेस नगरसेविकांनी केला.
हे प्रकरण गटनेत्यांच्या बैठकीत मिटविण्यासाठी महापौरांनी दोन वेळा बैठक बोलाविली, मात्र सभागृहाआधी गटनेते फिरकलेच नाहीत. सभा गुंडाळल्यानंतर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि समाजवादीचे गटनेते रईस शेख वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे गटनेते गैरहजर राहिले. विरोधी पक्षांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.