www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
- चेंबूर येथे राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- नाशिकमध्ये मनसे आमदार वसंत गीते यांच्यासह १३ नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
- मनसे नेते कप्तान मलिक यांना वी.बी.नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- दहिसर उड्डाणपूल मनसे कार्यकर्त्यांनी चक्का जाम करत पूर्णत: बंद पाडला आहे.
- मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार घोषणाबाजी सुरू असून महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा
- मुंबई मनसे आमदार राम कदम यांना पार्क साईट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- प्रविण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांना दहिसर टोलनाक्यावर अटक
- मनसे नेते शिशिर शिंदेंना जोगेश्वरी लिंकरोड परिसरात अटक
मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अवजड वाहनांच्या टायर्सची हवा काढून रस्ते जाम करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच पोलिसांच्या तुकड्या तेथे दाखल झाल्या आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा हायवेवर मनसेच्या कार्यकर्त्यांचं टोलविरोधी आंदोलन सुरु केल्यानंतर सकाळी टोलनाक्याला बंद पाडण्यासाठी निघालेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण त्यानंतर मुंबई-आग्रा हायवेवर दाखल झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून ठेवला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा दिसून आल्यात.
दरम्यान, मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीसा धाडल्या आहेत. पोलिसांनी काल रात्री नवी मुंबईतल्या ५० मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. वसई-विरार क्षेत्रातही पोलिसांनी ३३ जणांना रात्री ताब्यात घेतलं तर ७० जणांना नोटीस पाठविण्यात आली.
नाशिकच्या दिंडोरीमधूनही ६ मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर जालन्यातून ४०कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.चंद्रपूरमधून ८७ मनसे कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीस बजावण्यात आल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.