www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. महिलांवर बलात्कार, खून, हल्ला अशा संताप आणणाऱ्या घटना सतत घडत आहेत. सामान्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत पोलीस आहेत की नाहीत, अशी स्थिती आहे. परंतू सामान्यांसाठी पोलीस नाहीत हे वास्तवच असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
व्हीआयपी लोकांसाठी मुंबई पोलीस दलातील इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आहेत, की सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसच नसल्याचं समोर आलंय. मुंबईत व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी २८,४२० पोलीस तैनात असतात तर सव्वा कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी ५,५७८ पोलीस तैनात असतात. त्यामुळं इतक्या तुटपुंज्या पोलिसांच्या संख्येच्या बळावर सामान्य मुंबईकरांची सुरक्षा कशी शक्य होईल.
मुंबई पोलीस दलात ४१,४०१ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या असली तरी सुट्टी, रजा व रिक्त जागांमुळं ३३,९९८ पोलीस असतात. २०१० मध्ये १३,०१० पोलीस, २०११ मध्ये १९,३४९ पोलीस व्हीआयपी लोकांसाठी तैनात होते तर नोव्हेंबर २०१२ मध्ये व्हीआयपी सुरक्षेसाठी २८,४२० पोलीस तैनात आहेत.