मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांची परवड या वर्षीही थांबलेली नाही. वर्ष संपायला आलं तरी विद्यार्थ्यांनी शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. तर प्रशासन आणि सत्ताधारी, मात्र आपल्यामधल्याच वादात रंगले आहेत.
मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सुमारे साडे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सामान्य कुटुंबातल्या या विद्यार्थ्यांना महानगरपालिका 27 शालेय वस्तू देते. मात्र दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शालेय वस्तू वाटपात घोळ घालण्याची परंपरा प्रशासनानं कायम ठेवली.
यंदा तर शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी मुलांना दप्तर, खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली या तीन वस्तू बीएमसीनं दिलेल्याच नाहीत. या तीन वस्तूंऐवजी मुलांच्या पालकांना थेट पैसे देण्यात यावेत असं मत, पालिका प्रशासनाचं आहे. तर सत्ताधारी मात्र वस्तूच देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. प्रशासन आणि सत्ताधा-यांच्या या वादात विद्यार्थी मात्र वस्तूंविनाच राहिलेत.
सत्ताधारी प्रशासन वादात अडकलेत. तर पालिका सत्तेत असलेले शिवसेना भाजप एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. भाजपच्या ताब्यातल्या शिक्षण समितीनं पालिका शाळेतल्या मुलांसाठी 14 हजार बेंच खरेदीचा प्रस्ताव तयार केला. मात्र स्थायी समितीवर असलेल्या शिवसेनेनं हा प्रस्ताव टेबलावर न घेता राखून ठेवला आहे.
बीएमसी शाळांमधल्या मुलांच्या संख्येत दरवर्षी घट होत असल्याचं दिसून येतंय. अशावेळी शिक्षणाचा दर्जा वाढवून विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, सत्ताधारी आणि प्रशासन वादात गुंतलंय. तर भरडले जाताहेत ते सामान्य विद्यार्थी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.