मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूकीसाठी मतदान झालं. निवडणूकीच्या निमित्तानं युती आणि आघाडीमधील कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात...
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणा-या दोन सदस्यांसाठी रविवारी मतदान झालं. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यात चुरस आहे. सेना भाजपनं युतीत निवडणूक लढवली असली, तरी ऐन मतदानाच्या प्रक्रियेच्यावेळी भाजपचे नगरसेवक सेनेपासून अलिप्त राहिले. त्यामुळे रामदास कदमांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती...
एकिकडे शिवसेना-भाजपतली कुरबुरी चव्हाट्यावर आल्या तर तिकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही काही वेगळ चित्र नव्हतं. राष्ट्रवादी कॉँग्रेसनं बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांच्यावर निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत कारवाई केलीच नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीतही कॉँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि बंडखोर उमेदवार प्रसाद लाड आपल्याच हमखास विजयाचा दावा करताहेत...
समाजवादी पार्टीनं या निवडणूकीत अखेरपर्यंत आपले पत्ते उघड केले नाहीत. मनसेनं निवडणूकीत तटस्थ राहाण्याची भूमिका घेतली होती, पण पक्षाच्या नगरसेवकांना मतदान करण्यापासून रोखण्याची काळजी महापालिका नेत्यांना घ्यावी लागली. मतदान केंद्राबाहेर नेत्यांना कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह पहारा द्यावा लागला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी आणि मनसेच्या तटस्थ भूमिकमुळे या निवडणूकीत चुरस निर्माण होताना विजयाची समीकरणही बदललीयेत. आता सर्वाचंच लक्ष निकालांकडे लागून राहिलंय.