मुंबई : घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर छेडा नगर येथे पोलिसांनी मुंबई वरून पुण्याकडे जाणाऱ्या MH 14 DJ 0707 या निसान गाडीत 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. यानंतर 'मुंडे' भगिनी मात्र वादात सापडल्या आहेत.
या कारवाईत 10 करोडच्या चलनातून बाद झालेल्या 500 रुप्यांच्या नोटा असून 10 लाख किमतीच्या नवीन 2000 रुपयांच्या नोटा आहेत. ही रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांनादेखील ताब्यात घेतलं गेलंय.
या जप्त केलेल्या रकमेबाबत काही सवाल उपस्थित केले जात आहेत. ही रक्कम वैद्यनाथ अर्बन सहकारी बॅंकेची माहिती समोर येतेय. या बँकेच्या संचालक राज्यातील महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे या आहेत. त्यामुळे सुभाष देशमुखांनंतर आता प्रीतम मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बॅंकेची असून घाटकोपर शाखेतून पुण्यातील पिंपरी येथील शाखेत हे पैसे हे तीन इसम घेऊन जात होते. छेडा नगर जंक्शन येथे ही मोटार वाहतूक पोलिसांनी अडवली असता यात काही गोण्या असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी चौकशी केली असता त्यात रोकड असल्याचं लक्षात आलं. याबाबत वाहतूक पोलिसांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी या रोकडसह मोटार वाहन आणि त्या तीन इसमांना ताब्यात घेतलंय.