कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौर ते विविध समित्यांचे होणाऱ्या अध्यक्षांची नावे पाहता ही सर्व नावे फारशी परिचयाची नसलेली दिसतात. शिवसेना नेतृत्वाने मुंबई महापालिकेचे पदाधिकारी नेमताना 'लो प्रोफाईल' नगरसेवकांना संधी दिल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत अनेक दिग्गज आणि अनुभवी नगरसेवक असतानाही त्यांना डावलून अपेक्षित नसलेली नावे नेतृत्वाने समोर आणून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अनेक दिग्गजांना डावलून विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौरपदाची दिलेली संधी... आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकरांसारख्या दिग्गज नगरसेवकांना डावलून स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची निवड... आणि आता सुधार समिती अध्यक्षपदासाठी श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, रमाकांत रहाटे ही नावे स्पर्धेत असतानाही अनंत ऊर्फ बाळा नर यांना संधी दिली जाणं... तसंच बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी तर बेस्टचे कर्मचारी राहिलेल्या आणि पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या अनिल कोकीळांना संधी देणे... ही सर्व नावं पालिकेच्या राजकारणात फारशी चर्चेत नसलेली आणि लो प्रोफाईल असलेली... पण शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकून मोठी पदं पदरात टाकलीत.
शिवसेनेने अनेक सामान्य शिवसैनिकांना मोठं केलंय. पण अलीकडच्या काळात प्रस्थापितांना पदं वाटली जात असल्याचा आरोप शिवसेनेवर होवू लागला होता. यावेळी मात्र सेना नेतृत्वाने हा आरोप पुसून काढत लो प्रोफाईल नगरसेवकांना संधी दिलीय. यावेळी भाजप सत्तेत सहभागी नसल्यानं त्यांच्या वाट्याची पदंही शिवसेनेला मिळाली आहेत. त्यामुळं अधिकाधिक सेना नगरसेवकांच्या पदरात पदे पडत आहेत. ही पदे देताना सेना नेतृत्वाने 'लो प्रोफाईल' नगरसेवक तर पाहिले आहेतच शिवाय शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना समान संधी मिळेल, हेदेखील पाहिले आहे.
अनुभवी आणि दिग्गज नगरसेवकांना पदे देऊन सेनेत ते डोईजड झाले असते... अर्थातच हे प्रस्थापित नेत्यांना आणि बाहेर राहून कारभार हाकणाऱ्यांना सोयीचं नव्हतं... म्हणूनच त्यांचा पत्ता कट झाल्याचं समजतं. तसंच रिमोट कंट्रोलद्वारे पालिकेवर वचक ठेवायच असेल तर पदाधिकारी हा 'बोले तैसा चाले' असाच हवा, म्हणून ही सेनेची खेळी असल्याचंही म्हटलं जातंय.