www.24taas.com,मुंबई
मुंबईत सीएसटी परिसरात शनिवारी अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरू आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र, राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काल आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानमध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पन्नास हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. मात्र चारच्या सुमारास अचानक हिंसाचाराला सुरूवात झाली. मीडियाची ओबी व्हॅन्स आणि पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं. या गोंधळाच्या स्थितीत झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झालाय, तर 55 जण जखमी झालेत. 55 जखमींमध्ये 45 पोलिसांचा समावेश आहे.
तसंच बेस्टच्या अकरा बसेस जाळण्यात आल्या तर 25 बसेसची तोडफोड करण्यात आली. हा हिंसाचार उत्स्फूर्त की पूर्वनियोजित याची चर्चा आता सुरू झालीय. दरम्यान या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी दिलीय.
आसाममधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर जमावाकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर तीव्र शब्दात आसूड ओढलेत. गृहमंत्री मुंबईची शांतता बिघडविणा-या दंगलखोरांची पाळेमुळे खणून काढणार की त्यांच्यासमोर शेपूट घालणार तेच मला पाहाचय, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी एका वर्तमानपत्राला दिलीय.
आर.आर.पाटील यांच्या कारभारावर सर्वच जनता नाराज आहे. पुण्याचे बॉम्बस्फोट, मावळचा गोळीबार, जालन्यातील वारक-यांवरील पोलीसांचा अमानुष अत्याचार असो वा राज्यातील वाढती गुन्हेगारी या सर्व आघाड्यांवर आबा सपशेल नापास ठरले आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केलीय.
माझ्या भाषणावर पोलिसांकडून कायद्याचा किस काढला जातो एव्हढेच नाही तर माझ्यावर भाषण बंदी लागू करण्यात येते. मात्र आबांचे पोलीस रझा अकादमीच्या आंदोलनाला परवानगी कशी देतात, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. मतांच्या लाचारीमुळे आघाडी सरकार गप्प आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी केलीय.
मुंबईत घडलेल्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडं देण्यात आला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिलीय. तसंच यामागं षडयंत्र आहे का. याचाही तपास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी राज्यातल्या जनतेला शांततेचं आवाहन केलंय. देशभरातल्या पोलिसांने सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
मुंबईतल्या घटनेनंतर राजकीय पक्षांनी शांतता राखावी असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. जे झालं त्याचा तपास केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही घटनेचा निषेध केलाय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केलीय.
दरम्यान सीएसटीवरील हिंसक घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय.. शिवाय याबाबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करुन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.