www.24taas.com, मुंबई
एरव्ही, रॅश ड्रायव्हिंग संदर्भात कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे एका तरूणाचा हकनाक बळी गेलाय. विक्रोळी सुंदरनगर परिसरात घडलेली ही घटना आहे. या संदर्भात विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या गाडीची अवस्था पाहून अपघात किती गंभीर होता, त्याची कल्पना सगळ्यांनाच येतेय. सचिन पडवणकर हा ३४ वर्षांचा युवक विक्रोळीच्या सुंदरनगर परिसरातून सकाळी ऑफिसला जात होता. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पोलिसांच्या गाडीनं त्याला जोरधार धडक दिली. ही गाडी एवढ्या वेगात होती की सचिनला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या टेम्पोवर जाऊन ही गाडी आदळली. या जोरदार धडकेनं सचिन पडवणकरचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे पडवणकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. घरात सगळ्यात मोठा असणारा सचिन सगळ्यांना आधार होता. सचिनला अडीच वर्षांची मुलगी आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. मात्र, पोलीस या प्रकरणावर बोलायला तयार नाहीत.
पोलिसांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे एका तरूणाचा हकनाक बळी गेलाय. त्यामुळे दोषींवर कारवाई होऊन पडवणकर कुटुंबीयांना न्याय मिळेल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.